आगामी लेखसंग्रह : "इतिहासाच्या पाऊलखुणा"

मराठ्यांच्या केंद्रीय प्रशासकीय व्यवस्थेतील बदल : भाग १

कागदपत्रांवरून असे दिसते की ,साधारण शिवकाळ म्हणजे १७ व शतक आणि शाहुकाळ म्हणजे १८ व शतक , यात खूप फरक आहे , मराठ्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीत बरेच फरक पडले आहेत ,आपण जर ते समजून घेवू शकलो ,तर १७ व्या शतकाची ,१८ व्या शतकाशी तुलना बघू शकू …. काय होते हे फरक ,कशामुळे पडले हे फरक ? 

मराठ्यांच्या केंद्रीय प्रशासकीय व्यवस्थेतील बदल : भाग १

मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्थेचा अभ्यास हा खरतर मराठ्यांच्या यंत्रणेचा अभ्यास नसून तो त्यांच्या मुलभुत स्वभावाचा अभ्यास आहे, याच कारण अस की प्रचंड शूरता , दुर्दम्य आशावाद ,मैत्री निभावण्याची व्रुती असे मराठी रक्तात असणारे गुण तसेच अती आत्मविश्वास ,काही प्रमाणात बेशिस्त ,अंतर्गत राजकारण हे असे अवगुण दिसून येतात … खरतर म्हणून हा अभ्यास अतिशय मुलभुत आणि मराठेशाही समजण्यास गरजेचा वाटतो…
१६७४ ला शिवाजी राजांनी राज्याभिषेक केल्यानंतर स्वतःचे असे काही नियम घालून घेतले ,त्यातून व्यवस्था निर्माण होण्यासाठी स्वराज्याचे ३ भाग केले (सभासद बखर ) ,परंतु हे करत असताना शिवाजी राजांनी मोकासदारी पद्धती बंद केली ,परंतु वतनदारी राहिली असे दिसते (आज्ञापत्र ३५). तसेच वचक राहावा म्हणून सरकारी नोकरांची काही कालावधीने बदली करावी असेही योजिले गेले त्यानंतर वंशपरंपरागात नोकर्या हे ही देवू नये असेही योजिले (आज्ञापत्र ४६) , या बरोबरच अष्टप्रधान नावाची संकल्पना आणून ती यशस्वी रीत्या राबवली , त्यांनी केलेल्या कानून जाबत्या मध्ये तर कोणी काय काम करावे ,प्रत्येकाची जबाबदारी काय ,इतकेच नाही तर कोणी मोहिमेवर असल्यास त्याच्या गैरहजेरीत काय काम करावे हे ही नेमून दिले (कानून जाबता सनदपत्रे -साने पान १२२-१२४) . खरतर यातूनच महाराजांची दूरदृष्टी दिसून येते ,एका राजाचे आपल्या प्रजेवर केले जाणारे संस्कार दिसून येतात . यातूनच पुढे एक चांगले राज्य उभे राहिले …
१६८० साली महाराज निजधामी घेल्यावर तयार झालेली परिस्थिती ही मात्र मराठेशाहीला वेगळी होती ,यात राज्याचा वारस कोण म्हणून अष्टप्रधान मंडळात दुफळी माजलेली दिसते (मराठी रियासत भाग २ ,पान २३ ). खरतर यंत्रणा ही माणसे तयार करतात आणि तयार झालेल्या यंत्रणेतून पुढच्या पिढीची माणसे घडवायची असतात ,हेच आधुनिक काळातील यंत्रणा तयार करणार्याचे मुख्य सूत्र असावे ,कदाचित इतिहासातही हेच कारण असावे ,यंत्रणा तयार झाली की राज्य कारभार सुरळीत होवून त्याचा फायदा प्रजेस होतो . मुख्य राजाची असणारी धोरणं अतिशय कमी वेळात आणि शिस्तीत ती राबवू शकतो .
परंतु संभाजी राजांचा काळ हा मराठी राज्यास अतिशय कठीण असून त्यात अनेक उलाथापालठी झालेल्या दिसतात ,या काळात अष्टप्रधान जरी असले तरी त्यावर वचक असणारे कवीकलश हे मूळ सूत्रधार दिसतात, राज्याचा निर्णयात यांचा सहभाग असल्याचे दिसून येते (ज्वलज्वलतेजस संभाजी ),थोडक्यात अष्टप्रधान प्रमुख असणारी यंत्रणा ही संभाजी राजांच्या काळातच कमी झालेली दिसते ,उदा . पेशव्याचा विरोध असताना केलेला पोर्तुगीज -मराठा तह , प्रल्हाद निराजी असताना कवि कलशाने केलेले न्यायदान . यावेळी पहिल्यांदा कानून जाबत्याचे उल्लंघन दिसून येते ,त्याची करणे काही का असेनात? त्यांची इथे मीमांसा केल्यास लेख वाढेल …
१६८९ सालानंतर मराठी राज्य हे फार विचित्र क्लावाधीतून गेले ,यात राजाराम महाराजांनी सूत्र हातात घेऊन मराठेशाही स्थिर करण्याचा प्रयत्न केला ,परंतु विविध लढाया आणि आक्रमणांमुळे मराठे शाही आर्थिक अस्थिरतेत होती , राजारामाने मुळ पद्धतीत फरक करून एक नवीन पद तयार केले ,प्रतिनिधी ,राजाच्या गैरहजेरीत त्याचे अधिकार चालवणाऱ्या पुरुषास द्यावयाचे हे पद (चिटणीस राजाराम चरित्र ,पान ३३) त्याचा अधिकार सर्व प्रधानांवर चालवायचा असून ,त्याचा पगार सगळ्यात जास्त सालीना १३ हजार होन असे (मराठी रियासत भाग २ ,पान १८१ ) त्यामुळे हे पद अतिशय महत्वाचे आहे ,या पदाची निर्मिती राजारामास का भासली असावी ?तर सतत होणारी धावपळ आणि राज्य निर्मितीत प्रल्हादपंतानी केलेली मदत अस माझा तर्क आहे , खरतर राजारामाचे जिंजीला जाणे आणि तिथून राज्यकारभार सांभाळणे हेच मुळात राज्याच्या नव्या नियमांची नांदी ठरली ,पैसा नसलेल्या राज्याचा गाडा सांभाळायचं काम हे रामचंद्र पंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांनी एक वेगळी पद्धत आणून केले ,ते म्हणजे शिवाजीने खालसा केलेली वतने पुन्हा द्यावयास सुरुवात करणे ,आणि तेच मुख्य सूत्र निर्माण झाले (राजवाडे खंड १६/२७ ,खंड १७,२०/२१) . आधीच राजाचा झालेला दुर्दैवी मृत्यूतून दुखावलेले मराठे पुन्हा जोमाने उठून उभे राहिले, संतानी आणि धनाजी यांनी तर मुघलांना सळो का पळो करून सोडले. राजारामाने अष्टप्रधानांची नेमणूक केल्याने राज्याला नवीन मंडळ मिळाले ,परंतु १६७४ सालचा कानून जाबता आणि राजारामाचे अष्टप्रधान मंडळ बारकाईने बघितल्यास त्यातला असणारा फरक दिसून येयील ,तो फरक हा आहे की १६७४ साली राजा स्वतः मुख्यस्थानी असून तो प्रत्यक्ष नियंत्रण करणारा आहे ,तर राजारामाकडे १६७४ ची पद्धत असून अनेक मर्यादा आहेत ,त्यामुळे पद निर्माण करून राज्याचा विस्तार करणे ही त्याची गरज आहे …. मुळ अष्टप्रधानाचा गाभा बदल्याची सुरुवात येथेच दिसून येते ,असो १६९९- १७०७ हा काळ ताराराणीने अनेक चाली खेळून लढवला ,त्याचे श्रेय ताराराणीला देऊ तितके कमी आहे ,परंतु ताराराणीने आपला पुत्र शिवाजीला गाडीवर बसून राज्याभिषेक करविला …
आता आपण पुढे पाहिल्यास १७०७ ला शाहू मुघलांच्या दरबारातून सुटून आला ,परंतु शाहू आणि ताराराणी यांच्यात मराठी राज्याचा वारस कोण ही स्पर्धा सुरु झाली ,त्याची परिणीती अशी झाली की बादशाहने आधी राजा कोण ते ठरावा मग सनद देतो असे सांगितले. याचा परिणाम हा झाला की मराठी सत्तेत स्पर्धा सुरु झाली आणि मातबर लोक आपल्याकडे यावेत यासाठी रस्सीखेच झाली ,परिणीती अशी की १६७४ सालची पद्धती आणि आताची पद्धती यात फरक पडू लागला ,शाहूचे अष्टप्रधान बघता नारोशंकर ,अम्बुरव हणमंते ,मुद्गल उपाध्ये ,महाजी गदाधर ,नारोराम हे सहा लोकं केवळ शाहूला उपयोगी पडले म्हणून नेमले गेले ,याचा तोटा असा झाला की एकमेकांचा असणारा दबाव कमी पडला. (मराठी रियासत मध्य विभाग, बाळाजी विश्वनाथ पान १३० ) , एकंदर हा प्रकार आणि १६७४ सालचा शिवाजी राजांचा प्रकार यात बराच फरक दिसून येतो ,याला कारणीभूत कोण तर शिवाजीसारखा स्वतः तलबार बाजी करणारा पुरुष पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही ,असो यातून एक नवीन व्यवस्था जन्माला आली संघराज्य पद्धती ,यात मराठी राज्याच्या वसुल म्हणजे स्वत:च्या मालकीच्या मुलखाचा वसुल आणि मुघल सरकारातुन मिळणारी चौथाई …
आता या एकुण उत्पन्ना पैकी २५% रक्कम ही "राजबाबती" म्हणुन सरकारात जमा होई,साहोत्रा म्हणजे ६% आणी नाडगौडा म्हणजे ३% राजाला म्हणजे एकुण ३४% रक्कम सरकारात जमा होई, परंतू उरलेल्या ६६% रकमेचा मालक जहागिरदार अथवा वतनदार असे. हे करताना ४ मुख्य अटी अशा होत्या.
१)सरदारानी स्वत:च्या प्रांतातली मुलकी,लष्कर व्यवस्था स्वत: ठेवावी
२)सरदारानी कोणत्याही परराज्याशी लढाई, तह, राजाच्या व मुख्य प्रधानाच्या हुकुमाशिवाय स्वतंत्रपणे करु नये
३)खंडणी सरकारात भरावी
४)खंडणीचा हिशेब सरकारचे दरफदार तपासतील त्यांना तपासू द्यावा
ह्या चार अटीं सरदारानी मोठ्या आनंदाने मान्य केल्याने मराठी संघराज्य वाढलं. . .आणी सरदारांचे छत्रपतींच्या हद्दीत वतन,इनाम असल्याने त्यांना छत्रपतींशी प्रेमाने वागावे लागे.
आता एकुण उत्पन्नाच्या ६६% भाग हा स्वत:साठी ठेवायचा असल्याने ,त्याच्या वसुलीसाठी प्रथम सैन्य ,फौजा राखणे भाग होते,त्यासाठी कर्ज जरुरीचे राहीले. . या नव्या संकल्पने मुळे राज्य झपाट्याने वाढू लागले असले तरी राजाच्या जवळचं असलेल मंत्रीमंडळ आणि जनता यात थेट संबध कमी आला ,अष्टप्रधान हे नाममात्र तेव्हाच झाले होते कारण या यंत्रणेत मोहिमेचा आदेश शाहूने द्यायचा परंतु सैन्य मात्र सरदारांचे असे अशी विचित्र स्थिती या यंत्रणेत होती ,अशी यंत्रणा आणि १६७४ सालची यंत्रणा यात फरक दिसतो ,तो असा या यंत्रणेत सरदारांना स्वतंत्र होते ,उत्पन्नांच्या ६६% वाटा ते खात ,केंद्रीय सत्तेचा थेट हस्तक्षेप नसे परंतु सगळी पद ही वंशपरंपरागत पद्धतीने दिली जात ,कारण स्वायत्ता ….
आता पर्यंत आपण १६७४ ते १६४९ पर्यंतचा काळ बघितला ,या काळात प्रत्येक राजाच्या काळात होत जाणारे प्रशासकीय बदलही आपण पहिले , उत्तरोत्तर काळात हेच घडले आहे की शिवकालीन केंद्रीय व्यवस्था ही कमी होत जावून एक नवीन केंद्रीय व्यवस्था उदयाला येवू लागली ,याचे फायदे तोटे हा या लेखाचा भाग नसून त्याची चर्चा या पूर्वी केलेली आहे ,परंतु या नव्या व्यवस्थेला खुद्द राजाने म्हणजे राजाराम आणि शाहू यांनी जन्माला आणि वाढवल्या मुळे त्याचे श्रेय त्यांना देणे उचित ठरेल…
आता १७४९ नंतर बाळाजी बाजीरावाने शाहूचा कारभार हाताशी घेतला आणि अष्टप्रधान मंडळाचे महत्व कमी केले असे बरेच जण म्हणतात ,आपण या आधीच बघितले आहे की अष्टप्रधानाचे महत्व हे १७४९ सालं नसून ,शाहूने आणि राजारामाने स्वीकारलेली नवीन व्यवस्था आहे , आता बालाजी बाजीरावाने अस काय केल की १७४९ नंतर त्याच्यावर एक हाती कारभार केला हा आरोप येतो
१)नानासाहेब पेशव्याचा कालखंड हा खुप वेगळा होता,याच कारण सातारा दरबारात सुरु झालेल्या सत्तेच्या वारसदाराच्या हालचाली,या काळाची सुरुवात १७४५-४६ पासुनच सुरुवात झाली होती,सातारच्या ताराराणी आणी सकवार बाई राजसत्ता अप्रत्यक्षपणे आपल्या हाती यावी म्हणुन पुर्ण प्रयत्नशिल होत्या . . नेमक याच काळात कर्जही वाढलं होतं ,नाना साहेबानी रामचंद्र बाबाला लिहीलेल्या पत्रात ते म्हणतात "राजश्री स्वामींचे सरकार कर्जदार झाले व महालाचे खर्च अनिवार,यास्तव राजश्री स्वामींनी आपले कारभारी यासं ताकीद करुन बंदोबस्त करितात.घरच्याच कारभारात राजश्री दंग आहेत,त्याही होवुन आम्हास निरोप द्यावा तर आपले कारभारात गिरीफदार" हे पत्र २१-१०-१७४६ ला लिहिलेलं आहे. . .त्यानंतर १६-१२-१७४६ ला रामचंद्र बाबाना लिहीलेल्या पत्रात म्हणतात "सारांश उभयता महालाचे ( सकवार बाई आणी ताराराणी ) अती प्राबल्य जाहले आहे.याचा विस्तार कोठवरी ल्याहवा???आम्ही युक्ती करुन रेटणे ते रेटितो.काही आयकावे लागते,काही करुन देतो म्हणतो.या रितीने येशिल विचार आहे,राजश्री रघोजी भोसले वराडातुन माहुर प्रांती आले,त्यांच्या चित्तात आमच्या मुलकात घासदाणे घ्यावे ऐसा विचार आहे ,जागाजागातून महालकरी यांची पत्रे येतात,मशारनिले तो स्नेहयुक्ती भावभक्तीची पत्रे पाठवीतात,तथापी त्यांचा प्रकार कपटी आहे .तो तुम्ही जाणतचं आहा.""ही दोन्ही पत्रे काव्येतिहासकारांनी अनुक्रमे लेखांक ५५ ,५९ मध्ये छापली आहेत. . .
२)या काळात स्वराज्यावर स्वकीयांची अनेक खूप संकट आली ,
नानासाहेबांनी नाना पुरंदरे यांना लिहिलेल्या पत्रात शाहू महाराजांविषयी काय म्हणतात बघा " महाराजांनी ज्यास हाती दिल्हे त्यास संदेहस्थली ठेवणे हे गोष्ट आमचे रीतीस योग्य नव्हे "(ऐतिहासिक साहित्य खंड ७ ,१३ ) दरम्यान याच काळात पोर्तुगीज नानासाहेबांविषयी काय बोलतात ते पहा ,"नानाने आम्हाला कधीच स्वास्थ्य लाभू दिले नाही " याच पत्रात ताराराणीचे कारस्थान दिसून येत. (ऐतिहासिक साहित्य खंड ११ ,१३ )
३)१७४६ साली काही आठवडे नानास पेशवेपदावरुन शाहुंनी दुर केले,त्याच्यांकडुन "शिक्के कटार व जरी पटका हुजुरे पाठवुन जमादारखान्यांत दाखल करविले"नानाने काहीही विरोध न करता शाहूची आज्ञा मान्य केली उलट "अपराधी सर्वस्वे आहे,पायापाशी कोणती सेवा सांगणे ती आज्ञा होवून पायांचा वियोग मात्र न व्हावा" अशी विनंती केली "याजवरुन बहुत कृपावंत होवून एकनिष्ठ सेवक खरे याजपासोन कदापी अंतर पडावयाचे नाही" असे म्हणतं शाहूंनी पुन्हा प्रधानपद दिले (शाहूबखर पृ ९०-९१) आणि
थोडक्यात या सगळ्या प्रकारात राज्याची राजधानी असणाऱ्या सातारा शहरात ,राज्याच्य वारसाचे राजकारण चालू झाले आणि यात सहभाग होता तो खुद्द दोन राण्यांचा ताराराणी आणि सखवार बाई ,ताराराणी ह्या आमच्या धनी आणी आश्रयदात्या आहेत असं मानणार्या पेशव्यांच्या विरुद्धात ताराराणी कट रचू पाहतं होती,अखेरीस रामराजेंना वारस म्हणुन दर्जा दिला ,ते नवे राजे झाले पण रामराजेंना राजकीय चुणुक नव्हती,त्यांचा स्वभावन नेमका कसा आहे हे नाना पुरंदरेंनी नानासाहेबाला लिहीलेल्या पत्रात दिसुन येतो ,हीच वेळ साधुन रामरायांच्या नावाचा वापर करायचा आणी सुत्र हाती घ्यायचा घाट ताराराणीने घाटला, होळकर,शिंदे,भोसले नागपुरकर यांना फितवण्याचा प्रयत्न केला,पण त्यास तिला यश आले नाही, रघुजी भोसले बंगालच्या व्यापात व्यस्त होता,
पेशव्याने प्रतिनिधींचा प्रदेश रघुजिच्या नावावर करुन एका दगडात दोन पक्षी मारले,त्यातच शिंद्यानी आपला कारभारी रामचंद्रबाबावर रोष पकडला,तातडीने रामचंद्रबाबास बदलुन रामाजी अनंत दाभोळकरास शिंद्यांचा नवा कारभारी नेमला , दरम्यान ताराराणीने पहील्यांदा रामराजेंना अटक केली ,दाभाडे नी गायकवाडांना हाताशी घेतलं आणी पेशव्यांच्या विरोधात बंड केलं,त्यासाठी पोर्तुगिज,निजाम,यांच्याशी संधान बांधले,पोर्तुगिजाना वसई परत देवू केली, यासंदर्भात तुळाजी आंग्राला पोर्तुगिजाने मदत करण्याचे कबुल केले .हा प्रसंग पेशव्याचा कसं लावणारा होता त्यामुळे एकीकडे उत्तरेतला गोंधळ,त्यात सातार्यातलं राजकारण ,वर त्यात निजामाची धामधुम ,कमी म्हणुन की काय तर त्यात आपल्याच सरदारांच बंड अशा कठीण परीस्थितीला या पेशव्याला सामोर जावं लागलं,पुढे भागानगरचा हिशेब लावल्यावर ,गायकवाडाच बंडही पेशव्याने मोडलं आणी ताराराणीच घाणेरडं कारस्थान मोडून काढलं,
स्वकीय ,आप्त लोकांपासून राज्य संकटात असताना ,त्यालाही अष्टप्रधान मंडळातल्या लोकांची साथ असताना एका प्रधानाने काय करायला हवे होते ! स्वतः राणीच (राजारामला कैद प्रकरण) ,(पोर्तुगीजांना वासई ताब्यात देण्याच वचन ) राज्य ताब्यात घेण्यासाठ सरदारांना फितवू लागली हेच मोठे आश्चर्य या मराठी राज्याला पाहावे लागले ,यावर मुख्य प्रधान म्हणून नानाने दिलेली प्रतिक्रिया मला एक इतिहासाचा वाचक म्हणून योग्य वाटते . या सगळ्यातून हेच सिद्ध होत की शाहूने आपला प्रतिनिधी म्हणून राज्याचा गाडा हा नानाच्या हातात दिला ते योग्यच होत.
हे सार काही बघितल्यावर हेच कळते की मराठी राज्य जरी वर वर बघत १५० वर्षाचे राज्य असले तरी त्यात अनेक स्थित्यंतरे झाली आहेत ,मूळ गाभा असलेली प्रणाली किंवा यंत्रणा तशी राहिली नाही ,त्यामुळे हे सार काही बघत " मराठ्यांच्या प्रशासकीय यंत्रणा " एका साचेबध्द पद्धतीने मांडून कोणत्याही निर्णयाप्रत येण कठीण आहे , कोणत्याही राज्यात व्यक्तिगत प्रशासन सूरु होणे हे त्या यंत्रणेमुळे नसून तर कर्तृत्ववन माणसाची कमी होत जाणारी ताकद हे आहे . ह्यात अजून बराच काही लिहिण्यासारख आहे ,विस्तारभयास्तव थांबतो …

©  शिवराम कार्लेकर ,पुणे