आगामी लेखसंग्रह : "इतिहासाच्या पाऊलखुणा"

नानासाहेब पेशवे आणि तुळाजी आंग्रे !!

नानासाहेब पेशवा आणि तुळाजी आंग्रे यांच्यातल्या वादावर बर्‍याच जणांचे मतमतांतरे आहेत, मुळात आंग्रेयांचा इतिहास हा एका रियासतीचा इतिहास आहे हे मान्य करावं लागेल, या कोकणच्या भूप्रदेशात इंग्रज, डच, पोर्तुगीज, आंग्रे, कोल्हापूरकर, सातारकर होते, त्यामुळे  केवळ एका गोष्टीवरून एका अंगाने निष्कर्ष काढणे फार कठीण जाते … 
मुळात सरखेल कान्होजी आंग्रे गेल्यावर म्हणजे १७२९ ला, सेखोजी आंग्रे यांजकडे सगळी जबादारी आली, कान्होजी यांना ६ मुले, १) सेखोजी २) संभाजी ३) मानाजी ४) तुळाजी ५) येसजी ६) धोंडजी …  सेखोजी यांनी आलेली जबाबदारी फार उत्कृष्ट रित्या निभावली, बाजीराव पेशवे यांना जंजिरा मोहिमेत मदत करून दौलतित भर घातलापरंतु दुर्दैवाने १९३४ सालीच ते मृत्यू पावल्याने पुढे आंग्रे घराण्यात वाद तयार झालेत ,काही इतिहासकारांनी या वादाला बाजीराव पेशव्यांनी खतपाणी घातल्याचा आरोपही केला ,परंतु बाजीराव स्वतः मुलुखगिरी करणारे असल्याने असले राजकारण त्यांचे हातून होईल हा आरोप उपरोक्त कागद पत्रातून दिसत नाही , याचे कारण असे की सेखोजींच्या पश्चात संभाजी आणि मानाजी यात सत्तेसाठी वाद झाला ,खरेतर संभाजी जेष्ठ असल्याने सरखेल पद तिथेच आले होते ,परंतु वेळपडल्यास संभाजी आंग्रे यांचा स्वभाव हा पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याशी संगनमत करणारा असल्याने बाजीरावांनी मानाजी यांची बाजू घेतली असे दिसते (१)

तरीही स्वतः बाजीराव यांनी १७३५ साली  संभाजी आणि मानाजी यांचे मतैक्य केले, त्यांनी कुलाब्यात मानाजी आणि सुवर्णदुर्गात संभाजी असे वाटप करून, वाजारत माप हे नवीन पद तयार करून ते मानाजीस आणि सरखेल हे पद संभाजीस करून दिले (२), खरे पाहता बाजीराव यांनी जे केले ते काही आंग्रे घराण्याला नवीन असे नव्हते, कारण दत्ताजी  आणि कान्होजी या आंग्रे बंधूनी या पूर्वी विजयदुर्ग आणि कुलाबा वाटून घेतले होते असा उल्लेख सापडतो(३).. परंतु सत्ता हवी असल्याने संभाजी आणि मानाजी आंग्रे बंधूंमध्ये हा समझोता जास्त वेळ टिकला नाही , उलट पक्षी मानाजींवर हल्ला करून त्यांनी पुन्हा आपल्याकडे वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला ,एप्रिल १७४० ला चिमाजी अप्पा ब्रह्मेंद्र स्वामींना लिहितात "संभाजी राजे सरखेल एकाएकी अलिबागेत उतरून हिराबोट घेतला, सागरगड घेतला ,चिलचा कोट घेतला, ये समयी येउन आपले रक्षण करावे असे मानाजीने नानास कळवले"(४) आणि याच वेळी मानाजीच्या मदतीला इंग्रज आणि स्वतः नानासाहेब जावून संभाजीला पराभूत केले ,आणि तुळाजी आंग्रे याला कैद केले ,पुढे सोडून दिलेयाच पत्रात आप्पा म्हणतात " मानाजी यांची स्थापना आम्ही केली, परंतु त्यास स्मरण नाही ऐसे झाले, पैक्याविषयी वारंवार लिहिले, परंतु ते गोष्ट चित्तात न ये, आज पाच वर्षात एक पैसा आमचा देणे, तो दिल्हा नाही, बहुतच अमर्याद मांडली "खरेतर जानेवारी १७४० साली, वसई घेतल्या नंतर इंग्रजांना मराठ्यांचा धोका वाटला होता, म्हणून ते मराठ्यांशी संबध चांगले ठेवू इच्छित होते, यातूनच पोर्तुगीज मराठे करार झाला आणि त्याला इंग्रजांचीही मदत झाली, या करारानुसार आंग्रे यांच्याशी जेव्हा भांडण होईल तेव्हा इंग्रज आणि फिरंगी यांनी पेशव्यांना मदत करावी असे ठरले (५). पेशव्यांना पोर्तुगीजांना हतबल करून खंडणी वसूल करावयाची इच्छा होती यासाठी त्यांना आंग्रे यांचे आरमार हवे होते, हे आंग्रे यांच्या लक्षात आल्यावर रेवदांडा आणि कोरला  हे किल्ले पेशवे यांना मिळू नये याची खटपट मानाजी यांनी केली, त्यासाठी त्या किल्ल्याचा खर्च करावयास आपण तयार आहोत हे विजरई यास सांगितले (६), यावर असे दिसते की भले आंग्रे यांचे आरमार मोठे दिसत होते तरीही दौलातीत त्याचा कितपत उपयोग होई ?

पुढे संभाजी आंग्रे यांचा मृत्यू १७४२ साली झाला, त्यानंतर तुळाजी यांनी सूत्रे हातात घेतली ,तुळाजी इंग्रजांना प्रचंड लुटे त्यामुळे इंग्रज स्वतः घाबरून असतं, त्यामुळे तुळाजी आंग्रे यांचा बिमोड व्हावा असे त्यांना नेहमी वाटे, परंतु या नंतर पेशवे आणि तुळाजी यांचे संबध तणावाचे झाले आणि पेशव्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी करून तुळाजीस हरवले.
 खरतर पेशवे आणि तुळाजी यां बाबतचा बराचसा पत्रव्यवहार हा प्रसिद्ध झाला आहे, १७५३ साली तुळाजी यांनी विशाळगडावर हल्ला चढवला(७), इतकच नाही तर १७५२ साली तुळाजी आंग्रे, सलाबत जंग ,ताराराणी या संघाने बाळाजी बाजिराव यांच्याविरुद्ध कट कारस्थान रचले होते(८), या नंतर स्वतः नानासाहेब यांनी तुलाजीला पत्र लिहून त्यांची समजूत काढली होती, हे पत्र अत्यंत महत्वाचे असून ते सोबत देत आहे, १७४० च्या तहानुसार नानासाहेब यांनी पोर्तुगीजांची मदत मिळणे गरजेचे होते परंतु  तुळाजीनी पोर्तुगीजांना पैसे देऊन त्यांची मदत घेतली(९)
खरेतर अंजनवेळ आणि गोवळकोट ही स्थळे तुलाजीनी सिद्दी यांच्या हातून घेतली होती परंतु त्यांनी ती स्वतःकडे ठेवली, पुढे पोर्तुगीजांनी आपली फौज खारेपाटण येथे ठेवून तुलाजीस मदत केली, परंतु नंतर इंग्रजांनी विजरईला निषेध प्रकट केल्यावर निघून गेले(१०).

त्यानंतर ११ फेब्रुवारी १७५६ ला इंग्रजांनी विजयदुर्गावर तोफाडागायला सुरुवात केल्या ,किल्ला ताब्यात द्या असा निरोप इंग्रजांनी पाठवला ,परंतु ऐन वेळेस तुळाजी तहासाठी तयार झाले ,त्यांनी आणि रामाजी महादेवाने बोलणी सुरु केली होती ,परंतु इंग्रजांनी वेळ न  दडवता हल्ला केला ,याचे आश्चर्य स्वतः रामजी महादाजीस वाटले , याचे कारण असे की इंग्रजांना तुळाजी आंग्रे हवे होते (११), तुळाजी आंग्रे यांचा ताबा पेशव्यांनी स्वतः कडे ठेवला ,परंतु या  संपूर्ण हकीकतीत २ उल्लेख असे मिळतात  पहिला म्हणजे रामाजीपंत यांनी इंग्रजांच्या किल्ल्यातल्या अधिकार्याला एक लक्ष रुपयाची दिलेली लाच (१२) आणि पोर्तुगीज विजरई ने म्हटले आहे "तुलाजीने विजयदुर्गावरचे  स्वतःचे आरमार स्वतः जाळून टाकले (१३) या नंतर मात्र पेशव्यांनी इंग्रजांना स्वतः पत्र लिहून विजयदुर्ग खाली करावयास लावला , इतकच नाही तर १७५९ साली झालेल्या पोर्तुगीज करारात म्हटले आहे " तुळाजी चाकर आमचा ,त्याजपासून बेजाबता वर्तणूक झाली, यामुळे त्यास तंबी करणे जरुरी आहे, ऐसे पत्र लिहिले ,तुम्ही माशार्निलेस २ लाखरुपये घेवून त्याच्या कुमकेस गेला ,तो पैका तुम्हापासून येणे आहे, तुमचे शास्त्र बघता पैका द्यावा  " (१४), पेशव्यांनी तुळाजी आंग्रे यांच्या रुद्राजी धुळप याच सुभेदाराची विजयदुर्ग येथे नेमणूक केली ,त्यावर पोर्तुगीज म्हणतात "याची चाचेगिरी अशीच सुरु राहिली तर दुसरा आंग्रा या किनार्यावर उत्पन्न होईल "(१५)

एकंदरीत अनेक कागदपत्र बघता, नानासाहेब पेशव्यांचा हेतू आरमार बुडवणे होता  हा  आरोप १००% खराच  आहे असे वाटत नाही, यावर अनेक मतमतांतरे असू शकतात, परंतु इंग्रजांनी नंतर राज्य बळावले ही घटना नंतरची आहे, तसेच शिवप्रभूंच्या दृष्टीकोनाची तुलना या कालखंडाशी करणे तितकेसे योग्य नाही  . . .

© शिवराम कार्लेकर ,पुणे


संदर्भ :-
१)कुलाबकर आंग्रे यांचा इतिहास:- पान ९५
२)तत्रैव 
३)कुलाबकर आंग्रे यांचा इतिहास:- पान ६
४)मराठी रियासत :-बाजीराव पान ३८८
५)पोर्तुगीज मराठे संबध :- पिसुर्लेकर ,पान २०१
६)पोर्तुगीज मराठे संबध :- पिसुर्लेकर ,पान २०४
७)पेशवे दप्तर :-२४.८३
८)पोर्तुगीज मराठे संबध :- पिसुर्लेकर ,पान २३६
९)पोर्तुगीज मराठे संबध :- पिसुर्लेकर ,पान २४१
१०)पोर्तुगीज मराठे संबध :- पिसुर्लेकर ,पान २४३
११)कुलाबकर आंग्रे यांचा इतिहास:- पान ११०
१२)कुलाबकर आंग्रे यांचा इतिहास:- पान ११६
१३)पोर्तुगीज मराठे संबध :- पिसुर्लेकर ,पान २४२
१४)पोर्तुगीज मराठे संबध :- पिसुर्लेकर ,पान २५२
१५)पोर्तुगीज मराठे संबध :- पिसुर्लेकर ,पान २४४